हेडरीत ‘लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग’चा जल्लोषात शुभारंभ
– १६ गावांचे संघ मैदानात; ग्रामीण क्रिकेटसह युवा प्रतिभेला मोठे व्यासपीठ
The गडविश्व
हेडरी, दि. ०७ : एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे बहुप्रतिक्षित लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग (LVPL) स्पर्धेचा मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमी, युवक आणि गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
ग्रामीण भागातील क्रिकेट प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे आणि गावागावांतील सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण युवकांना आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना बी. प्रभाकरन यांनी सांगितले की, “लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून ग्रामीण प्रतिभा, युवा सक्षमीकरण आणि सामुदायिक एकतेचा उत्सव आहे. गावांना ‘एक संघ, एक भावना’ या ध्येयाने जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
या स्पर्धेत परिसरातील तब्बल १६ गावांचे संघ सहभागी झाले असून संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. ६ मेपासून सुरू झालेल्या या लीग सामन्यांमुळे परिसरात क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
उद्घाटन सोहळ्यात “आपलं गाव, आपले खेळ” तसेच “एक संघ, एक गाव, एक जिद्द” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत अधिक वाढविली.
कार्यक्रमाला पुरसलगोंदीचे उपसरपंच राकेश कौडा, उदेरा ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश गोटा, विविध पोलीस अधिकारी, गाव पाटील, पोलीस पाटील तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील क्रीडा विकासासाठी अशा स्पर्धांची आवश्यकता अधोरेखित केली.
उद्घाटनाच्या दिवशी लॉयड्स क्रिकेट टीम आणि ऑल ग्रामीण इलेव्हन यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळविण्यात आला. सहा षटकांच्या या रंगतदार सामन्यात लॉयड्स संघाने दमदार विजय मिळवत प्रेक्षकांची दाद मिळवली.
लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीगमधील सर्व सामने हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स ग्राउंडवर खेळविण्यात येणार असून, ही स्पर्धा ग्रामीण क्रीडा विकास, युवा सक्षमीकरण आणि सामाजिक ऐक्याचे प्रभावी प्रतीक ठरत आहे.














