भिवंडीत भीषण इमारत दुर्घटना ; कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळली, ९ जणांचा मृत्यू
– मलब्यात आणखी काहीजण अडकल्याची भीती, NDRF-TDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य
The गडविश्व
भिवंडी, दि.३१ : भिवंडीतील भंडारी कंपाउंड परिसरातील गंगाराम वाडी येथे कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून, इमारतीच्या मलब्यात आणखी काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. NDRF आणि TDRF च्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, आतापर्यंत तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
कोहिनूर अपार्टमेंट ही सुमारे १४ ते १५ वर्षे जुनी चारमजली इमारत होती. या इमारतीत एकूण ३२ कुटुंबे वास्तव्यास होती. इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने संबंधितांना नोटीस बजावली होती. त्यानंतर इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते.
प्राथमिक माहितीनुसार, दुरुस्तीच्या कामादरम्यान एकाच वेळी तीन पिलर तोडण्याचे काम सुरू असताना इमारतीचा तोल गेला आणि संपूर्ण बी विंग क्षणार्धात कोसळली. दुर्घटना घडताच अनेक रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेत जीव वाचवला मात्र काही नागरिक मलब्यात अडकले.
दुर्घटनेनंतर बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. लोखंडी सळ्या कापून मलब्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी स्मृती (IGM) रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, बचाव पथकाने मलब्यातून सुखरूप बाहेर काढलेल्या नागरिकांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. दुर्घटना घडली तेव्हा तिचे आई-वडील कसेतरी इमारतीबाहेर पडले; मात्र ती मलब्यात अडकली होती. बचाव पथकाने अत्यंत काळजीपूर्वक प्रयत्न करत तिला सुरक्षित बाहेर काढले.
सध्या प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मलब्यात पाचहून अधिक नागरिक अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने बचाव पथकाकडून अत्यंत सावधगिरीने मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.













