गुरनोलीतील ७० वर्षांचा तलाव फुटला ; पाण्याच्या लोंढ्याने शेतशिवार जलमय, पिंपळगाव मार्ग खंडित

43

गुरनोलीतील ७० वर्षांचा तलाव फुटला ; पाण्याच्या लोंढ्याने शेतशिवार जलमय, पिंपळगाव मार्ग खंडित
– १० हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान, तहसीलदारांकडून घटनास्थळी पाहणी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ३० : तालुक्यात गुरुवारी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे गुरनोली गावातील सुमारे ७० वर्षांपूर्वीचा तलाव फुटल्याने मोठी दुर्घटना घडली. तलावातील पाणी प्रचंड वेगाने बाहेर पडून शेतशिवारात शिरल्याने परिसरातील शेती जलमय झाली. या घटनेत १० हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून गुरनोली–पिंपळगाव मार्गाचा काही भाग वाहून गेल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
अतिवृष्टीमुळे तलावाची पाळ फुटल्यानंतर लाखो लिटर पाणी प्रचंड वेगाने शेतशिवारात घुसले. पाण्याच्या लोंढ्यामुळे उभी पिके पाण्याखाली गेली असून अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व माती साचल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेती तसेच वाहून गेलेल्या रस्त्याचा पंचनामा करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, गुरनोली–पिंपळगाव मार्गाचा काही भाग पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांची ये-जा अडचणीत आली आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी पोलिस पाटील गंगाधर सयाम, सरपंच सुप्रिया तुलावी, उपसरपंच मंगेश कराडे, शेतकरी ओमप्रकाश लांजेवार, अरविंद लांजेवार, माणिक लांजेवार, एविता बोरकर, ग्राम महसूल अधिकारी राहुल गेडाम तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here