काटा न झाल्याने धान्य सडण्याच्या मार्गावर, रांगीत शेतकऱ्यांची धावपळ
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०६ : आधारभूत धान खरेदी योजनेची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपल्यानंतर धानोरा तालुक्यातील रांगी येथील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे. काटा न झाल्याने शेतकऱ्यांचे धान्य केंद्रावरच पडून असून ते सडण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रांगी येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या खरेदी केंद्रावर अनेक शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आधीच आणून ठेवले होते. ऑनलाइन सातबारा पूर्ण करूनही सुमारे 40 शेतकऱ्यांचे धान्य अजूनही काट्याविना पडून आहे. खरेदी प्रक्रिया उशिरा सुरू होणे, बारदान्याचा तुटवडा आणि 31 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांचे काटे होऊ शकले नाहीत.
मुदत संपताच खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँक व सावकारांची देणी कशी फेडायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. धान्याचे नुकसान होण्याची भीती आणि हमीभावापासून वंचित राहण्याची शक्यता यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
“खरेदी कालावधी तात्काळ वाढवून आमच्या धान्याचा हमीभावाने काटा करण्यात यावा,” अशी मागणी अशोक हलामी (कन्हाळगाव), लिलाबाई चांभारे (बोरी), राजेंद्र कुळमेथे (निमनवाडा), जयदेव नैताम (रांगी), संतोष नैताम (मासरगाटा) व वनिता देसाई (बोरी) यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
खरेदी केंद्रातील नियोजनातील त्रुटी आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रांगी परिसरातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.














