रांगी ग्रामपंचायतीचा आरोग्याकडे पुढाकार : ‘माझं गाव–आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला हिरवा कंदील
-ठराव सर्वानुमते मंजूर, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०६ : तालुक्यातील रांगी ग्रामपंचायतीत ‘माझं गाव–आरोग्यसंपन्न गाव’ अभियान राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी आयोजित विशेष ग्रामसभेत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या उपक्रमामुळे गावाला रोगमुक्त व आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
सरपंच प्रशासक सौ. फालेश्वरी प्रदीप गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बांबोळे यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार अभियानाची सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांना चालना देणे आणि ग्रामस्तरावर लोकसहभाग वाढविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोली जिल्ह्यातील ही महत्त्वाकांक्षी योजना लोकचळवळीत रूपांतरित करण्यासाठी रांगी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून, ‘आरोग्यसंपन्न गाव–समृद्ध गाव’ या ध्येयासाठी एकजूट दाखवली आहे.
या ग्रामसभेला आरोग्य सेवक श्री. सुरेश राजगडे, आशा वर्कर सौ. अनिता चापले, सौ. शीतल सूर्यवंशी, सौ. ज्योती पेंदाम, अंगणवाडी सेविका सौ. मंदा वरवाडे, सौ. ज्योती कुकडकार, सौ. सुनीता भुरसे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी अभियानाची माहिती जाणून घेत सक्रिय सहभागाची तयारी दर्शवली.














