गडचिरोली : मिरची पावडर फेकून दागिने लुटण्याचा डाव फसला, २४ तासांत तिघे जेरबंद

28

गडचिरोली : मिरची पावडर फेकून दागिने लुटण्याचा डाव फसला, २४ तासांत तिघे जेरबंद
– गडचिरोली पोलिसांची कारवाई, चौथा आरोपी अद्याप फरार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : ज्वेलरी दुकान बंद करून दुचाकीने घरी परतणाऱ्या सराफाच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
३१ ऑगस्ट रोजी रात्री सुरेश बाबूराव भोजापूरे (५०), रा. गडचिरोली, हे आपले ऐश्वर्या ज्वेलरी शॉप बंद करून दुचाकीने घरी जात होते. त्यांच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने होते. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील जंगल सोसायटीच्या कार्यालयासमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना जबरदस्तीने अडवले. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकून डब्याने मारहाण करत दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, भोजापूरे यांनी आरडाओरड केल्याने आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी १ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलिस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान विशाल घनश्याम देशमुख (३६, रा. रामनगर), राकेश विजय गिरसावळे (३५, रा. कन्नमवार नगर) आणि शहबाज सलाम शेख (३१, रा. विवेकानंद नगर), या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत चौथा आरोपी सोनू खांडेकर (२४, रा. विवेकानंद नगर) याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. तिघांना २ सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चौथा आरोपी फरार; शोध सुरू

या प्रकरणातील पाहिजे आरोपी सोनू खांडेकर याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण बुंदे करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, सहायक पोलीस निरीक्षक कपील आगलावे, पोलीस उपनिरीक्षक सागर रुपवते तसेच पोलीस अंमलदारांनी केली.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here