गडचिरोली : ‘मंत्रालयातील मोठ्या ओळखी’चा बनाव, शहीद जवानाच्या मुलालाच २.१६ कोटींचा गंडा
– अनुकंपा नोकरीच्या आमिषाने तब्बल दोन वर्षे सुरू होती फसवणुकीची खेळ
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या मुलालाच लक्ष्य करून ‘मंत्रालयात थेट ओळख आहे’ असा बनाव रचत तब्बल २ कोटी १६ लाख ७९ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षांहून अधिक काळ नियोजनबद्ध पद्धतीने ही फसवणूक सुरू होती. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य सूत्रधार ज्ञानेश्वर शिवाजी वारे यास अटक केली असून तपास अधिक गतीने सुरू आहे.
विशेष म्हणजे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा सुशिक्षित युवकच या जाळ्यात अडकला असल्याने, अशा टोळ्यांचा फैलाव किती खोलवर गेला आहे, यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सागर गणपत मडावी (वय २७, रा. दुर्गानगर, गडचिरोली) हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पुण्यात त्यांची ओळख ज्ञानेश्वर शिवाजी वारे (रा. भोर, जि. पुणे) याच्याशी झाली. सुरुवातीला मैत्रीपूर्ण व विश्वासार्ह वर्तन करत वारे याने ‘मंत्रालयात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी जवळीक आहे’असा विश्वास संपादन केला.
सागर मडावी यांचे वडिल २०१३ मध्ये नक्षल हल्ल्यात शहीद झाल्याने शासनाच्या अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते, हे लक्षात घेऊन आरोपीने त्याच मुद्द्यावर जाळे विणले. ‘उपजिल्हाधिकारी पदावर थेट नियुक्ती करून देतो’ असे आमिष दाखवत सुरुवातीला काही लाख रुपयांपासून सुरू झालेली ही व्यवहारांची साखळी पुढे कोट्यवधींपर्यंत पोहोचली. पुढे ‘महाजन साहेब’ नावाच्या कथित मंत्रालयीन अधिकाऱ्याचा हवाला देत व्यवहार अधिक गडद करण्यात आला. आरोपींनी फोनपे, आरटीजीएस व रोख व्यवहारांद्वारे पैसे उकळले, तसेच फिर्यादीची एटीएम कार्डे ताब्यात घेऊन खात्यांतून लाखो रुपये काढले. “प्रत्येक टेबलवर पैसे द्यावे लागतात” असे कारण देत सतत पैशांची मागणी करण्यात आली.
या संपूर्ण काळात सागर मडावी व त्यांच्या आईने मोठ्या विश्वासाने पैसे उभारले. या फसवणुकीमुळे फिर्यादीच्या कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला. आईने विमा पॉलिसी मोडणे, मालमत्ता विकणे, दागिने गहाण ठेवणे, कर्ज काढणे अशा मार्गांनी कोट्यवधी रुपयांची व्यवस्था केली. कुटुंबाची आर्थिक कंबर मोडूनही आरोपी सतत नवनवीन कारणे सांगत पैशांची मागणी करत राहिला.
दरम्यान, ‘तुमचे काम प्रत्येक टेबलवर आहे, प्रत्येक ठिकाणी पैसे द्यावे लागतात’ असे सांगून आणखी पैसे उकळण्यात आले. मात्र, शेवटी ‘पैसे नाही दिले तर काम होणार नाही आणि दिलेले पैसेही परत मिळणार नाहीत’ अशी धमकी देत फसवणुकीचा खरा चेहरा समोर आला.
या प्रकरणात ज्ञानेश्वर वारे, ‘महाजन साहेब’ (मुंबई), अजय गोवर्धन भगत, मुकेश यादव व संदीप कुमार यांनी संगनमत करून गुन्हा केल्याचे समोर आले आहे. विविध क्यूआर कोड, फोनपे क्रमांक व बँक खात्यांद्वारे पैशांची देवाणघेवाण करण्यात आली.
गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5) व 318(4) अंतर्गत २० मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी ज्ञानेश्वर वारे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, आर्थिक व्यवहारांचा तपासही सुरू आहे. या संपूर्ण फसवणुकीचा खेळ २० जानेवारी २०२४ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने घडला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा, शासनाच्या प्रक्रियेची जाण असलेला युवकही अशा जाळ्यात अडकत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय? ‘नोकरी लावून देतो’ या नावाखाली सुरू असलेल्या अशा फसवणूक रॅकेट्सवर कठोर कारवाईची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शासकीय नोकरीसाठी कोणतीही अधिकृत प्रक्रिया वगळून पैसे देऊ नयेत. ‘ओळखी’च्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #FraudCase #JobScam #GovernmentJobFraud #CyberFraud #FinancialFraud #PoliceAction #BreakingNews #MaharashtraNews #CrimeNews #ScamAlert #JobFraud #PublicAwareness #IndianNews














