कुरखेडा जंगलात मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, २२ जण ताब्यात
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत २२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल ७१ लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील जुगार, दारू व इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर 21 एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारास स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, कुरखेडा येथील एजाज शेख उर्फ ‘कात्या’ हा जंगल परिसरात काही इसमांना गोळा करून ताश पत्त्यांच्या सहाय्याने पैशांची बाजी लावत जुगार खेळत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि. भगतसिंग दुल्हत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेवर्धा जंगल परिसरात सापळा रचून छापा टाकला. अचानक धाड पडताच काही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी वेळीच घेराबंदी करून सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळी आरोपी ५२ पत्त्यांच्या सहाय्याने पैशांचा जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत एजाज रफीक शेख (वय 41, रा. कुरखेडा) याच्यासह एकूण २२ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून २ लाख ७५ हजार २०० रुपये रोख, जुगार साहित्य, २३ मोबाईल फोन, १३ चारचाकी वाहने व ६ दुचाकी वाहने असा एकूण ७१.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व गोकुल राज, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
जिल्ह्यातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘कडक बंदोबस्त’ सुरूच असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #KurKheda #PoliceAction #GamblingRaid #CrimeNews #BreakingNews #MaharashtraPolice #LawAndOrder #MidnightRaid #BigAction














