कमी व्होल्टेजचा फटका ; रांगी परिसरातील विद्युत उपकरणे निकामी
-अनियमित वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महावितरणविरोधात आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १६ : धानोरा तालुक्यातील रांगी व परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी दाबाने मिळणारी वीज यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यातही वाढलेल्या उकाड्यामुळे विजेची गरज अधिक असताना महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. कमी व्होल्टेज, वारंवार होणारे वीज खंडित होणे आणि बिलिंगमधील कथित अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कमी व्होल्टेजमुळे कुलर, फ्रीज, पाण्याची थंडकरण यंत्रे तसेच अन्य विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नाहीत. अनेक नागरिकांच्या कुलरच्या मोटारी जळाल्या असून काहींचे फ्रीज निकामी झाले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असून वाढत्या महागाईत सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडत आहे.
कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा परिणाम केवळ घरगुती वापरावरच नव्हे, तर व्यावसायिक कामकाजावरही होत आहे. गावातील पिठाच्या गिरण्या, धानभरडाई यंत्रे आणि अन्य उपकरणे सुरळीत सुरू होत नसल्याने नागरिकांना दळणासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. याचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसत आहे.
दरम्यान, ग्रामस्थांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतीने बसविलेला नवीन वॉटर कुलरही कमी व्होल्टेजमुळे गेल्या महिनाभरापासून सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे उष्णतेच्या दिवसांत थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळण्याची ग्रामस्थांची अपेक्षा अपूर्णच राहिली आहे. वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
आंदोलनाचा इशारा
रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. रांगी गावातील कमी व्होल्टेजची समस्या तातडीने दूर करून नियमित व दर्जेदार वीजपुरवठा सुरू करावा, बिलिंगमधील कथित अनियमितता थांबवावी आणि आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.













