सावली : रस्त्यावर अचानक समोर आला रानटी हत्ती; जीव वाचवण्यासाठी धावलेल्या युवकाचा घेतला बळी

122

सावली : रस्त्यावर अचानक समोर आला रानटी हत्ती; जीव वाचवण्यासाठी धावलेल्या युवकाचा घेतला बळी
– व्याहाड–सोनापूर मार्गावर घडली घटना
The गडविश्व
सावली, दि. ०२ : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात रानटी हत्तींच्या वाढत्या दहशतीने आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला आहे. व्याहाड–सोनापूर मार्गावर गुरुवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत व्याहाड येथील अतुल गोहने (वय ४०) यांचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अतुल गोहने हे दुचाकीने सोनापूरकडे जात असताना व्याहाड–सोनापूर मार्गावर त्यांच्या समोर अचानक रानटी हत्ती आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी दुचाकी रस्त्यावरच सोडून जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, संतप्त हत्तीने त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हल्ल्याबाबतची माहिती प्राथमिक स्वरूपाची असून, घटनेचा नेमका तपशील आणि मृत्यूचे कारण अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून सावली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा मुक्त संचार सुरू असून, शेतपिकांच्या नुकसानीबरोबरच मानवी जीवितालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनेक गावांमध्ये हत्तींचा वारंवार वावर आढळत असल्याने नागरिक सतत भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रानटी हत्तींचा कळप दोन भागांत विभागला असून, त्यातील काही हत्ती गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत, तर काही हत्ती अद्यापही सावली तालुक्यातच वावरत आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील सीमावर्ती गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हत्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण, संवेदनशील भागात सातत्याने गस्त, नागरिकांना वेळेवर इशारे, तसेच मनुष्यहानी टाळण्यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #wildelephantattack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here