मोफत टु-डी इको शिबिरातून बालहृदयरोगाचे होणार निदान ; ५ जुलैला गडचिरोलीत तज्ज्ञांकडून तपासणी

143

मोफत टु-डी इको शिबिरातून बालहृदयरोगाचे होणार निदान ; ५ जुलैला गडचिरोलीत तज्ज्ञांकडून तपासणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २ : बालहृदयरोगाचे वेळेत निदान करून गरजू बालकांना तज्ज्ञ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत टु-डी इको व हृदय तपासणी शिबिराचे आयोजन रविवार, ५ जुलै रोजी गडचिरोली येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारातून, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अशुतोष सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांची सखोल तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार टु-डी इको तपासणीद्वारे जन्मजात अथवा इतर हृदयविकारांचे निदान करण्यात येईल. तसेच गरज भासल्यास पुढील उपचार आणि हृदय शस्त्रक्रियेबाबतही तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे.
जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील सर्व गरजू पालकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे. अनेक बालकांमध्ये जन्मजात हृदयरोगाची लक्षणे वेळेत ओळखली जात नसल्याने गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. मात्र योग्य वेळी निदान व उपचार मिळाल्यास अशा मुलांचे जीवन सुरक्षित करता येते, असे त्यांनी सांगितले.
श्वास घेण्यास त्रास होणे, लवकर थकवा येणे, वजन अपेक्षित प्रमाणात न वाढणे, ओठ किंवा नखे निळसर दिसणे, छातीत दुखणे अथवा हृदयविकाराशी संबंधित इतर लक्षणे असलेल्या मुलांना या शिबिरात आवर्जून आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या आरोग्य उपक्रमाची माहिती अधिकाधिक पालकांपर्यंत पोहोचवून गरजू बालकांना तज्ज्ञ तपासणी, वेळेवर निदान आणि आवश्यक उपचारांचा लाभ मिळवून देण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here