देसाईगंज : ५५ तोळे सोने, ७ लाखांची रोकड देऊनही संपला नाही लोभ ; १० लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ

110

देसाईगंज : ५५ तोळे सोने, ७ लाखांची रोकड देऊनही संपला नाही लोभ ; १० लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ
– देसाईगंज पोलिसांत गुन्हा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : लग्नात ५५ तोळे सोन्याचे दागिने आणि ७ लाख रुपयांची रोकड दिल्यानंतरही आणखी १० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून देसाईगंज पोलिस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, देसाईगंज येथील एका तरुणीचा विवाह एप्रिल २०२५ मध्ये मध्य प्रदेशात मोठ्या थाटामाटात झाला होता. विवाहावेळी वधूपक्षाने वरपक्षाला ५५ तोळे सोन्याचे दागिने, विविध सोन्याचे अलंकार तसेच ७ लाख रुपयांची रोकड दिली होती. विवाहानंतर काही महिने सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र त्यानंतर विवाहितेकडे माहेरहून आणखी १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात येत होता.
तक्रारीनुसार, मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्यानंतर विवाहितेला वारंवार शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागला. ३ जून २०२६ रोजी पैशांच्या कारणावरून पुन्हा वाद घालत तिला बेदम मारहाण करण्यात आली. मोबाईल हिसकावून घराबाहेर काढत बंगळुरू विमानतळावर एकटीला सोडून दिल्याचाही आरोप तिने केला आहे. त्यानंतर जबलपूर येथे गेल्यावरही तिच्यावर मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद असून, तेथील पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने माहेरी परत येत देसाईगंज पोलिसांत तक्रार दाखल केली. मारहाणीत गळा, उजवा हात व पाठीला दुखापत झाल्याने तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पीडितेच्या तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध हुंडाबंदी कायदा व भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here