‘सोन्याची कोंबडी’ समजून गडचिरोलीचा वापर; दानवेंची भाजपवर टीका

28

‘सोन्याची कोंबडी’ समजून गडचिरोलीचा वापर; दानवेंची भाजपवर टीका
The गडविश्व
गडचिरोली, दि.१६ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देशभर सुरू असलेल्या ‘श्रीराम रक्षा आंदोलन’ च्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “गडचिरोलीला ‘सोन्याची कोंबडी’ समजून भाजपने केवळ सत्तेच्या राजकारणासाठी वापर केला. नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या या जिल्ह्याला अपेक्षित विकासापासून वंचित ठेवण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला.
देशभर सुरू असलेल्या ‘श्रीराम रक्षा आंदोलन’च्या अनुषंगाने नागपुरात होणाऱ्या आंदोलनासाठी विदर्भातून मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळावे, यासाठी खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्याच दौऱ्यादरम्यान त्यांनी गडचिरोलीत पत्रकार परिषद घेत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी दानवे यांनी भाजपवर टीका करताना “आज प्रभू श्रीराम आणि दानपेटीही सुरक्षित नाहीत; त्याचे श्रेय भाजपने घ्यावे,” असा घणाघात केला.
गडचिरोली जिल्ह्यातील विकास आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर लवकरच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. जिल्ह्यातील वन्यजीवांच्या वाढत्या समस्येसह स्थानिक प्रश्नांवर आदित्य ठाकरे स्वतः लक्ष घालतील, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही दानवे यांनी निशाणा साधला. “गडचिरोलीतील नागरिकांनी आता स्वतःच्या हक्कासाठी पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे. जिल्ह्याला अपेक्षित न्याय मिळालेला नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता नसतानाही विकासाची गती दिसून येत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
पत्रकार परिषदेला विधानसभा संपर्क प्रमुख नंदू कुमरे, जिल्हाप्रमुख पवन गेडाम, माजी जिल्हा परिषद सदस्या वेणूताई ढवगावे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here