रेती स्टॉक पॉईंट परिसरात हत्येने खळबळ ; झुडपात आढळला युवकाचा मृतदेह
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १६ : धानोरा तालुक्यातील राजोली येथील कठानी नदीवरील रेती स्टॉक पॉईंट परिसरात एका युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतालगतच्या झुडपात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, शाब्दिक वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
धानोरा मुख्यालयापासून सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावरील रेती स्टॉक पॉईंटजवळ मंगळवारी (१५ जुलै) सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांना आबाजी निकेसर व राजेंद्र निकोडे यांच्या शेताच्या बांधालगतच्या झुडपात युवकाचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच चातगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला.
मृतदेह रेती डम्पिंग स्टेशनपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर आढळल्याने पोलिसांनी परिसरातील कामगार, नागरिक तसेच संबंधितांची कसून चौकशी सुरू केली आहे.
प्राथमिक तपासात रेती स्टॉक पॉईंटच्या लिलावधारकाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नागपूरहून रेती भरण्यासाठी आलेल्या एका टिप्परचा चालक आणि क्लिनर यांच्यात सोमवारी काही कारणावरून शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले आहे. या वादाचेच पर्यवसान हत्येत झाले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याची ओळख निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, हत्येचा नेमका उलगडा करण्यासाठी धानोरा पोलीस विविध अंगांनी तपास करीत असून, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही, वाहनांची माहिती आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.













