आंधळीत मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११७ जणांची तपासणी

5

आंधळीत मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११७ जणांची तपासणी
– ३२ मोतीबिंदू रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २२ : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि मोफत नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आंधळी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात ११७ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून, ३२ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
हे शिबिर महात्मे आय बँक हॉस्पिटल (नागपूर), समता फाउंडेशन (मुंबई), आधार ग्रामीण विकास संस्था (आंधळी) आणि गट ग्रामपंचायत आंधळी-नवरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
दिवसभर चाललेल्या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या डोळ्यांची सखोल तपासणी केली. तपासणीत ३२ रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाल्याने त्यांच्यावर नागपूर येथील महात्मे आय बँक हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया व पुढील उपचार करण्यात येणार आहेत. तसेच दृष्टीदोष असलेल्या ७७ गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपप्रशासक तथा माजी उपसरपंच अप्रव भैसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वरी सिन्हा, डॉ. अरविंद डोंगरवार, माजी ग्रामपंचायत सदस्य नानाजी खुणे, मीनाक्षी डोंगरे तसेच सीएचओ वानखेडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत अशा आरोग्यविषयक शिबिरांची ग्रामीण भागात सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मे हॉस्पिटलचे आयुष गायकवाड, निशा कुमारी, संकेत शेंमभरकर, अविनाश आडे, तसेच आशा सेविका कोकिता सयाम, वैशाली पंधरे, रत्ना नैताम, ग्रामपंचायत कर्मचारी घनश्याम उईके, शिपाई माधुरी सयाम व गुलशन सयाम यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक सुरेंद्र गौतम यांनी केले, तर मंदा वारके यांनी आभार प्रदर्शन केले. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here