मालेवाड्यात अर्धवट नाला सफाईचा फटकाc; बसस्थानक व माऊली माता मंदिर परिसर जलमय
– ग्रामस्थ संतप्त
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २२ : मालेवाडा गावातील बसस्थानक परिसर आणि माऊली माता मंदिराकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसानंतर पाण्याखाली गेला असून, नागरिक व प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नाल्यांची अर्धवट आणि निकृष्ट दर्जाची सफाई झाल्याने पाण्याचा निचरा बंद पडला असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीमार्फत नाल्यांची स्वच्छता करण्यात आली होती. मात्र, नाल्यांतील गाळ व कचरा पूर्णपणे न काढल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर आणि घरांसमोर साचत आहे. परिणामी बसस्थानक परिसरासह माऊली माता मंदिर मार्गाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे.
“नाल्यांची सफाई केवळ नावापुरती करण्यात आली. अर्धवट कामामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने प्रत्येक पावसात हीच समस्या निर्माण होते,” असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
साचलेल्या गढूळ पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली गेल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांच्या अपघाताची शक्यताही वाढली आहे.
दरम्यान, संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तातडीने नाल्यांची संपूर्ण स्वच्छता करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मालेवाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.













