चामोर्शीत पोलिसांची धडक कारवाई : 8.24 लाखांचा अवैध मद्यसाठा व XUV जप्त

22

चामोर्शीत पोलिसांची धडक कारवाई : 8.24 लाखांचा अवैध मद्यसाठा व XUV जप्त
-पोलीस पथकाचा पाठलाग चुकवत आरोपी जंगलात पसार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : गडचिरोली जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदी कायद्याला हरताळ फासत अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात चामोर्शी पोलिसांनी धडक कारवाई करत 8 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठ्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा XUV कार जप्त करण्यात आली असून, मुख्य आरोपी जंगलाचा फायदा घेत फरार झाला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 11 जुलै रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुनघाडा फाटा येथे सापळा रचण्यात आला.
दरम्यान, संशयित महिंद्रा XUV (एमएच-49-एई-5925) वाहन दिसताच पोलिसांनी ते अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक राजेंद्र सपन मंडल (वय 27, रा. कुनघाडा, ता. चामोर्शी) याने वाहनाला यू-टर्न घेत दुसऱ्या चारचाकीला धडक देत घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांचे वाहन अडकल्याने पथकाने खासगी वाहनाच्या मदतीने संशयिताचा पाठलाग सुरू ठेवला. टायरच्या खुणांचा माग काढत शोधमोहीम राबविल्यानंतर आरोपीने नवरगाव जंगल परिसरात वाहन सोडून जंगलात पलायन केल्याचे आढळून आले.
पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 3,500 बाटल्या रॉकेट संत्रा देशी दारू, हॅवर्ड्स 5000 बिअरचे 24 कॅन, रॉयल स्टॅग विदेशी मद्याच्या 148 बाटल्या तसेच वाहतुकीसाठी वापरलेली XUV असा एकूण 8 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 65(अ), 98 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाहू दंडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here