धोक्यात आलेला पत्रकारितेचा धर्म वाचविण्यासाठी संघटित व्हा : संदीप काळे

54

धोक्यात आलेला पत्रकारितेचा धर्म वाचविण्यासाठी संघटित व्हा : संदीप काळे
– भंडाऱ्यात ‘पत्रकार हक्क परिषद’, विदर्भातील हजाराहून अधिक पत्रकारांची उपस्थिती
The गडविश्व
भंडारा, दि. १२ : “लोकशाहीचा आणि समाजव्यवस्थेचा आधार असलेली पत्रकारिता आज अनेक आव्हानांच्या विळख्यात सापडली आहे. राजकीय दबाव, सामाजिक आव्हाने आणि बदलत्या परिस्थितीमुळे पत्रकारिता आपला मूळ धर्म गमावण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यामुळे धोक्यात आलेला पत्रकारितेचा धर्म वाचविण्यासाठी सर्व पत्रकार, संपादक, माध्यम संस्थांचे प्रतिनिधी आणि पत्रकारितेशी संबंधित प्रत्येक घटकाने संघटित होऊन संघर्ष उभारला पाहिजे. ही केवळ पत्रकारांची नव्हे, तर लोकशाहीच्या अस्तित्वाची लढाई आहे,” असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया व व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.
भंडारा येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय ‘पत्रकार हक्क परिषद’ व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेला विदर्भातील हजाराहून अधिक पत्रकार, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, माध्यमांसमोरील सध्याची आव्हाने, बदलत्या माध्यमविश्वातील जबाबदाऱ्या आणि संघटित पत्रकार शक्तीची गरज यावर मार्गदर्शन करताना काळे म्हणाले, “पत्रकारिता ही केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजाप्रती असलेली नैतिक जबाबदारी आहे. सत्याचा शोध घेताना अनेक पत्रकार स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची आणि भविष्याची पर्वा न करता कार्य करतात. मात्र आज पत्रकारांवर हल्ले होतात, खोटे गुन्हे दाखल होतात, आर्थिक असुरक्षितता वाढत आहे आणि मूलभूत संरक्षणही मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी पत्रकारांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे.”
ते पुढे म्हणाले, “आपण येथे केवळ समस्या मांडण्यासाठी नव्हे, तर त्यावर उपाय शोधण्यासाठी जमलो आहोत. संघटित पत्रकार हीच सर्वात मोठी ताकद आहे. आपण एकजुटीने उभे राहिलो तर कोणतीही शक्ती पत्रकारितेचा आवाज दाबू शकणार नाही. व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरमने पत्रकारांचे घर, आरोग्य, शिक्षण, कौशल्यविकास आणि सामाजिक सुरक्षेसाठी सातत्याने काम केले असून हा प्रवास प्रत्येक पत्रकाराचा आहे.”
“आपण स्पर्धक नाही, तर सहकारी आहोत. विचारभिन्नता असू शकते; मात्र पत्रकारितेच्या हितासाठी एकदिलाने उभे राहणे आवश्यक आहे. पत्रकारिता टिकली तरच लोकशाही मजबूत राहील,” असे आवाहन करत त्यांनी पत्रकारांच्या सन्मान, सुरक्षितता आणि स्वातंत्र्यासाठी एकत्रितपणे लढण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख, विदर्भ विभागाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, भंडारा जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर, नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे, गडचिरोली जिल्हा प्रवक्ते नसिर हाशमी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया पुढाकारातून विदर्भातील पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजनांची सुरुवात करण्यात आली. यामध्ये पत्रकारांसाठी विमा संरक्षण व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भातील योजनांचा समावेश आहे.
विशेष अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उद्योजक जयंत गज्जर, जॅकी रावलानी, डिम्पल मल्होत्रा, रूपेश टांगले, जिल्हाधिकारी सावन कुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन उपस्थित होते. तसेच खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार डॉ. परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, नाना पटोले, राजू कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, माजी खासदार सुनील मेंढे, माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
सायंकाळी पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बॉलिवूड गायिका राधा खुळे आणि प्रणय सतलज यांच्या “पाटलांचा बैलगाडा” या संगीतमय कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भंडारा जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here