
ऐन दिवाळीत कामगारांवर काळाचा घाला; कठाणी नदी पुलाजवळ अपघातात दोघांचा मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : दिवाळीच्या सणातच डोंगरसावंगी येथील दोन मिस्त्री कामगारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गडचिरोलीहून गावाकडे परतत असताना कठाणी नदी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिसरा कामगार जखमी झाला आहे.
मनोज शामराव सोनटक्के (वय ३२) आणि मानिक मुरलीधर कांबळे (वय ४०), अशी मृतांची नावे आहेत. तर कृष्णा अरुण घुटके (वय २७) हे जखमी झाले आहेत. तिघेही आरमोरी तालुक्यातील डोंगरसावंगी येथील रहिवासी असून मिस्त्री काम करीत होते. ७ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील काम आटोपून तिघेही दुचाकीने गावाकडे निघाले होते. सायंकाळी ६.३० ते ६.४५ वाजताच्या सुमारास गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलाजवळ अज्ञात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याने उपचारादरम्यान प्राण गमावले. या घटनेमुळे डोंगरसावंगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी कृष्णा घुटके यांच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भास्कर ठाकरे करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #crimenews













