
गडचिरोलीत पोलिसांची ‘माओवादमुक्त दिवाळी’; ७० पोलीस केंद्रांवर नागरिकांसोबत साजरा केला सण
– बिनागुंडा येथे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांची नागरिक व जवानांसोबत दिवाळी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : माओवादाच्या हिंसक सावटातून मुक्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात यंदाची दिवाळी शांतता, विश्वास आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी ठरली. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरातील ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांच्या कार्यक्षेत्रात नागरिकांसोबत ‘माओवादमुक्त दिवाळी’ साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, अतिदुर्गम बिनागुंडा येथे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी स्वतः नागरिक व पोलीस जवानांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
मे २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’नंतर जिल्ह्यात माओवाद संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यंदाच्या दिवाळीत सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले. दुर्गम भागातील नागरिकांशी विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे आणि शांतता व विकासाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पोलीस मदत केंद्र बिनागुंडा येथे भेट देऊन नागरिक व जवानांसोबत दिवाळी साजरी केली. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा यांनी गर्देवाडा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी पेंढरी, तर अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. यांनी जिमलगट्टा येथे नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतला.
जिल्ह्यातील एकूण ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना मिठाई व फटाक्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, हिंसक विचारसरणीचा त्याग करून आत्मसमर्पण केलेल्या माजी माओवादी सदस्यांसोबतही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिवाळी साजरी करण्यात आली. नवजीवन वसाहत येथे त्यांना मिठाई व फटाक्यांचे वाटप करून पोलिसांनी त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगण्यासाठी त्यांच्यात विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा यामागील उद्देश होता.
दुसरीकडे, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त व दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबांची दिवाळीही गोड व्हावी, यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला. गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी, प्रोजेक्ट कृषी समृद्धी, सेवा मित्र मंडळ आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू शेतकरी कुटुंबांना अन्नधान्य व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
शांतता आणि विकासाचा संदेश
माओवादमुक्त गडचिरोलीच्या वाटचालीत सुरक्षा व्यवस्थेसोबतच सामाजिक सलोखा, लोकसहभाग आणि नागरिकांचा विश्वास महत्त्वाचा आहे. पोलीस व नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करून शांततामय, सुरक्षित आणि विकसित गडचिरोली घडविण्यासाठी असे लोकाभिमुख उपक्रम यापुढेही सुरू राहतील, असे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी. जे. यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदारांनी हा उपक्रम यशस्वी केला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #MaoistFreeGadchiroli #GadchiroliPolice #MaoistFreeDiwali #GadchiroliNews #DiwaliCelebration #OperationAntimPrahar #GadchiroliDevelopment #PolicePublicRelations #MaharashtraPolice













