देशाचे लक्ष गडचिरोलीकडे : १३ नोव्हेंबरपासून जनजातीय गौरव दिनाचा भव्य सोहळा

5

देशाचे लक्ष गडचिरोलीकडे : १३ नोव्हेंबरपासून जनजातीय गौरव दिनाचा भव्य सोहळा
– १५ नोव्हेंबरला देशस्तरीय मुख्य कार्यक्रम; पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन साधणार संवाद, राज्यपाल व मुख्यमंत्री राहणार उपस्थित
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाचा देशस्तरीय मुख्य सोहळा यंदा गडचिरोलीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात भव्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार असून, राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अन्य मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याला सुमारे ८ ते १२ हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असून, जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रमापूर्वी आवश्यक व्यवस्था पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

१२०० आदिवासी कलाकार सादर करणार सांस्कृतिक कार्यक्रम

१३ आणि १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात राज्यभरातील सुमारे १२०० आदिवासी कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांच्या निवास आणि भोजनासाठी शासकीय वसतिगृहे, मंगल कार्यालये व हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात येत आहे. कार्यक्रमस्थळी वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि अखंडित वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या ऑनलाइन सहभागासाठी उच्चगती इंटरनेट आणि दृकश्राव्य यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सूचना बीएसएनएल व एनआयसीला देण्यात आल्या आहेत. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी पूर्वचाचणी करण्यासह पर्यायी वीजव्यवस्थाही सज्ज ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र वाहनतळ, अतिरिक्त एसटी बससेवा, १०० फिरती शौचालये, वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था केली जाणार आहे.

१८ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर सेवा सप्ताह

जनजातीय गौरव दिनानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान राज्यभर भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
११ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये, तर १२ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जमातीबहुल तालुक्यांच्या मुख्यालयांत पत्रकार परिषदा आयोजित करण्यात येतील. १३ नोव्हेंबर रोजी पात्र लाभार्थ्यांना न्यूक्लियस बजेटअंतर्गत धनादेशांचे वितरण तसेच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनमन योजना आदींचे लाभ दिले जाणार आहेत. महिला बचत गट, स्वयंरोजगार आणि कृषिपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठीही उपक्रम राबविण्यात येतील.
१४ नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारके व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, दीपोत्सव आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. याच दिवशी गडचिरोलीत भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
१५ नोव्हेंबर रोजी मुख्य देशस्तरीय सोहळ्यासोबत राज्यातील सर्व जिल्हा व अनुसूचित जमातीबहुल तालुका मुख्यालयांत आदिवासी महापुरुषांना अभिवादन करण्यात येईल. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि समूहांचाही सन्मान केला जाणार आहे.

आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर भर

१६ नोव्हेंबर रोजी विशेष सेवा शिबिरांच्या माध्यमातून आधार कार्ड दुरुस्ती, वनपट्टेधारकांना योजनांचा लाभ, शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि अर्ज भरण्यासाठी सहाय्य केले जाईल. १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य शिबिरांमध्ये रक्तदाब, मधुमेह आणि सिकलसेल तपासणीसह माता-बाल आरोग्य व पोषणविषयक मार्गदर्शन करण्यात येईल.
१८ नोव्हेंबर रोजी सेवा सप्ताहाचा समारोप शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांनी होणार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जात वैधता प्रमाणपत्र, व्यावसायिक शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले जाईल. युवक-युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, अप्रेंटिसशिप आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय कृषी, पशुसंवर्धन, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहारांबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन आणि पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या संघर्षाच्या स्मरणार्थ केंद्र शासनाने १५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून घोषित केला आहे. आदिवासी स्वातंत्र्यवीरांचे योगदान, संस्कृती, परंपरा, भाषा आणि ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंदा देशस्तरीय सोहळ्याचे यजमानपद गडचिरोलीला मिळाल्याने जिल्ह्याच्या आदिवासी सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here