
गडचिरोलीत सापाच्या अंड्यांतून ६५ दिवसांनी बाहेर आले पिल्लू; कृत्रिम उबवणीचा प्रयोग यशस्वी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात गडचिरोलीत एक महत्त्वपूर्ण प्रयोग यशस्वी झाला आहे. बांधकामाच्या ठिकाणी आढळलेल्या तस्कर जातीच्या सापाच्या अंड्यांची तब्बल ६५ दिवस काळजीपूर्वक देखभाल केल्यानंतर त्यातून पिल्लू बाहेर आले. सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक अजय कुकडकर आणि चंद्रपूर येथील डॉ. खत्री महाविद्यालयातील पीएच.डी. संशोधक सौरभ सातपुते यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले आहे.
गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावरील बजाज शोरूमच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकामादरम्यान सेंट्रिंगच्या पाट्यांखाली सापाची अंडी असल्याचे मजुरांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत सर्पमित्रांना माहिती दिली. त्यानंतर अजय कुकडकर आणि सौरभ सातपुते यांनी घटनास्थळी पोहोचून अंड्यांची पाहणी केली आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली.
अंड्यांमधील भ्रूणांची वाढ योग्य प्रकारे व्हावी, यासाठी आवश्यक तापमान आणि पोषक वातावरण राखत दोघांनीही ६५ दिवस सातत्याने देखभाल केली. कृत्रिम पद्धतीने अंडी उबविण्याचा प्रयोग करण्यात आला. अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अंड्यातून पिल्लू बाहेर आले आणि या प्रयोगाला यश मिळाले.
या प्रयोगामुळे सापांच्या प्रजनन प्रक्रियेचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली असून, वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनेही हा अनुभव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बांधकामाच्या ठिकाणी नष्ट होण्याची शक्यता असलेल्या अंड्यांचे संरक्षण करून त्यातून पिल्लू बाहेर येईपर्यंत घेतलेली काळजी विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
साप हा पर्यावरणातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असून उंदीर आणि इतर जीवांची संख्या नियंत्रित ठेवण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे साप किंवा त्यांची अंडी आढळल्यास त्यांना इजा न करता प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अजय कुकडकर आणि सौरभ सातपुते यांच्या या उपक्रमाचे वन्यजीवप्रेमींकडून कौतुक होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #WildlifeConservation #SnakeConservation #SnakeRescue #WildlifeProtection #NatureConservation #Maharashtra













