गडचिरोली : नागरिकांनी २६ भरमार बंदुका व ११ बॅरल केले पोलीसांच्या स्वाधीन

164

– नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक आता माओवादी विचारसरणी झुगारून शांततेच्या व विकासाच्या मार्गावर चालू लागले आहेत. दुर्गम भागातील नागरिकांनी स्वेच्छेने आपल्याजवळील शस्त्रे पोलीसांकडे जमा करण्यास सुरुवात केली असून, त्यातून पोलिसांवरील लोकांचा वाढता विश्वास अधोरेखित होत आहे.
अलीकडेच पोस्टे वांगेतुरी हद्दीतील हिंदुर, नैनवाडी आणि तोडगट्टा या अतिदुर्गम गावांतील नागरिकांनी आपल्या ताब्यातील 26 भरमार बंदुका व 11 बंदुकीची बॅरल स्वेच्छेने गडचिरोली पोलीस दलाच्या स्वाधीन केल्या.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र असून, पारंपरिक शेतीसोबत अनेक नागरिक शिकार करून उदरनिर्वाह करत असतात. वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी आणि शिकारासाठी त्यांनी वडिलोपार्जित बंदुका बाळगलेल्या होत्या. मात्र, माओवादी या परिस्थितीचा फायदा घेत, अशा शस्त्रधारी नागरिकांना चळवळीत सामावून घेण्याचा प्रयत्न करत असत.
गेल्या काही वर्षांत परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. गेल्या पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातील एकही तरुण माओवादी चळवळीत सहभागी झालेला नाही, हे विशेष यश पोलिसांच्या नागरीकृती उपक्रमांमुळे शक्य झाले आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना आवाहन केले होते की, आपल्या ताब्यातील अवैध किंवा निष्क्रिय भरमार बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस ठाण्यात जमा कराव्यात. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वांगेतुरी परिसरातील नागरिकांनी आपली शस्त्रे पोलीस दलाकडे सुपूर्द केली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी योगेश रांजणकर यांच्या नेतृत्वात पोस्टे वांगेतुरीचे प्रभारी अधिकारी सपोनि दिलीप खडतरे, पोउपनि सादुलवार, पोउपनि काळे, तसेच सीआरपीएफ अधिकारी व स्थानिक अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडली.
गेल्या काही वर्षांतील आकडेवारीनुसार जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बंदुका स्वाधीन केल्या आहेत. सन 2022 – 73 बंदुका, सन 2023 – 46 बंदुका, 2024 – 26 बंदुका, सन 2025 (आतापर्यंत) -29 बंदुका व 12 बॅरल. यासह आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी एकूण 365 भरमार बंदुका पोलीस दलाच्या स्वाधीन केल्या आहेत.
ही आकडेवारी नागरिकांच्या मनातील पोलिसांवरील वाढता विश्वास आणि माओवादी चळवळीचा होत असलेला अंत स्पष्टपणे दर्शवते. नागरीकृती उपक्रमांमुळे दुर्गम भागातील नागरिक आता भयमुक्त वातावरणात जीवन जगत असून, शांततेचा आणि विकासाचा नवा अध्याय सुरू होत आहे.
या उल्लेखनीय कार्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी-अंमलदारांचे तसेच शस्त्रे जमा करणाऱ्या नागरिकांचे कौतुक करत म्हटले की,
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #latestnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here