– सुरजागड प्रकरणात याचिकाकर्त्याचा पराभव, न्यायालयाने फेटाळला दावा, दंड ठोठावण्याचा इशारा
The गडविश्व
नवी दिल्ली, दि. २५ : गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) यांच्या सुरजागड लोहखनिज खाणींना दिलेल्या पर्यावरण मंजुरीविरोधात दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याचा दावा फेटाळला असून न्यायालयाने ही याचिका ‘प्रायोजित जनहित याचिका’ असल्याचा संशय निर्माण होतो असे स्पष्ट करत दंड ठोठावण्याचा इशारा देताच याचिकाकर्त्याने तत्काळ अपील मागे घेतले.
या प्रकरणात यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एलएमईएलविरोधात दाखल दोन जनहित याचिका फेटाळून लावत, त्या “योग्यताविहीन आणि आधारहीन” असल्याचे नमूद केले होते. तरीही रायपूर येथील खाण कंत्राटदार समरजीत चॅटर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी याचिका (एसएलपी) दाखल केली होती.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारच्या जनहित याचिका ‘प्रायोजित हेतूने दाखल’ केल्या जात असल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की, “कायद्याअंतर्गत घालून दिलेल्या सर्व नियम व प्रक्रियेचे पालन करूनच सक्षम अधिकाऱ्यांनी एलएमईएलला पर्यावरण मंजुरी दिली आहे.”
दंड टाळण्यासाठी याचिकाकर्त्याच्या वकिलाने तातडीने अपील मागे घेतले. तसेच याचिकाकर्ता समरजीत चॅटर्जी यांनी यापूर्वीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता २५,००० रुपयांचा दंड अद्याप न भरल्याचेही न्यायालयाने नोंदवले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सुरजागड लोहखनिज खाणींना मिळालेली पर्यावरण मंजुरी कायदेशीरदृष्ट्या वैध ठरली असून, एलएमईएलला मोठा दिलासा मिळाला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #SurjagadMines #SupremeCourt #LloydsMetals #Gadchiroli #EnvironmentClearance #Judiciary #Maharashtra














