कोरची : वीज कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जखमी

84

कोरची : वीज कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जखमी
– गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट, अनेक भागात पावसाची संततधार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा -कोरची, दि.२५ : जिल्ह्यात आज सकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या दरम्यान कोरची तालुक्यातील केसालडाबरी येथे वीज कोसळून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव सरगम सोमनाथ कोरचा (वय १७, रा. केसालडाबरी) असे असून, तो मसेली येथील छत्रपती विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. तर जखमीचे नाव योगेश घावळे असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, सध्या गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश भागात धान कापणीचा हंगाम सुरू आहे. सरगम हा आपल्या वडिलांच्या शेतात धान कापणीच्या कामात मदत करत होता. दुपारी अचानक हवामान बदलल्याने विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. कापलेले धान भिजू नये म्हणून सरगम व त्याचा नातेवाईक ताडपत्री धनाच्या गंजी वर झाकत होते. पावसाचा जोर वाढल्याने दोघेही जवळच्याच झाडाखाली आसरा घेऊन थांबले असता अचानक त्या झाडावर वीज कोसळली. यात सरगम आणि योगेश दोघेही गंभीर जखमी झाले. तत्काळ शेतातील इतरांनी धाव घेऊन दोघांना कोरची ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरगमला तपासून मृत घोषित केले. जखमी योगेश घावळे याच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चिचगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे केसालडाबरी आणि मसेली परिसरात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनी शासनाकडे सरगमच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Korchi #LightningStrike #StudentDeath #HeavyRain #MaharashtraNews #RuralNews #Chichgad #Monsoon2025 #TheGadVishva #BreakingNews #TragicIncident #WeatherAlert

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here