पांदन रस्ता झाला चिखलमय ; शेतकरी हैराण, प्रशासनाचे दुर्लक्ष
– रांगी परिसरातील निमगाव फाटा ते ऋषी उसेंडी शेतापर्यंतचा रस्ता रखडला
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : तालुक्यातील रांगी ग्रामपंचायती अंतर्गत निमगाव फाट्यापासून ऋषी उसेंडी यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदन रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्यावरून बैलबंडी, ट्रॅक्टर किंवा शेतीची साधने नेणे-आणणे शेतकऱ्यांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत आहे.
प्राप्त माहितीनुसार, रोजगार हमी योजनेअंतर्गत या पांदन रस्त्याच्या निर्मितीसाठी तब्बल 23 लाख 52 हजार 851 रुपये खर्च करण्यात आले. मात्र, रस्ता तयार होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटूनही यावर मुरूम किंवा खडी टाकण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो आणि मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालवणे धोकादायक बनते.
स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, “धान कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतातील पीक, बैल, ट्रॅक्टर किंवा साहित्य ने-आण करताना रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे. अनेकदा बैल व ट्रॅक्टर रस्त्यातच अडकतात. या रस्त्याचे खडीकरण न झाल्याने आम्हाला रोज तारेवरची कसरत करावी लागते.”
पांदन रस्त्याचे मातीकाम पूर्ण झाले असले तरी खडीकरणासाठी निधी मिळालेला नाही, त्यामुळे काम ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की, “जेव्हा रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर होतात, तेव्हा खडीकरणासाठी निधीचा अभाव कसा?”
तसेच, पांदन रस्त्यांचे सर्वेक्षण, क्रमांक देणे व महसूल दप्तरी नोंद करणे अत्यावश्यक असून, त्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
या नादुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून ते कापणीपर्यंत शेतात ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करून या रस्त्याचे खडीकरण पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
#thegdv #thegadvishva #Gadchiroli #Dhanora #Rangi #FarmersIssue #RuralDevelopment #EmploymentGuaranteeScheme #RoadRepair #Infrastructure #AdministrationNegligence #BreakingNews














