तेंदुपत्ता हंगामापूर्वीच जंगल पेटतेय : आग लावण्याच्या घटनांकडे वन विभागाचे दुर्लक्ष
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ११ : गडचिरोली जिल्ह्यात तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच जंगलात आगीच्या घटना वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. तेंदुपत्ता लवकर फुटावा आणि पाने सहज उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने काही ठिकाणी जाणूनबुजून जंगलात आग लावली जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे.
तेंदुपत्ता हंगामाच्या काही आठवडे आधीच जंगलातील सुकलेले गवत, झुडपे व पानझड जाळली जात असल्याचे प्रकार अनेक भागांत पाहायला मिळत आहेत. परिणामी जंगलातील लहान रोपे, दुर्मीळ औषधी वनस्पती तसेच विविध वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होत आहे.
मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जंगलात आग लावणाऱ्यांवर आतापर्यंत ठोस कारवाई झाल्याची उदाहरणे क्वचितच दिसत असल्याने अशा घटनांना आळा बसत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांच्या मते, तेंदुपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने जंगलातील गस्त वाढवून आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा या प्रकारामुळे जंगलातील नैसर्गिक संपत्ती व जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.














