देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रातील पहिलीच आयएसओ शाळा ; नैनपूरच्या म. गांधी नगर परिषद शाळेची ऐतिहासिक कामगिरी
The गडविश्व
ता. प्र /देसाईगंज, दि. ११ : देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या म. गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर ता. देसाईगंज, जि. गडचिरोली या शाळेने ऐतिहासिक यश संपादन करत ISO 9001:2015 Quality Management System अंतर्गत आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रातील प्रथम आयएसओ मानांकित शाळा होण्याचा बहुमान या शाळेला मिळाला असून हा संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
या उल्लेखनीय यशामागे शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नारायण तिघरे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले समर्पित कार्य कारणीभूत ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने गुणवत्ता, शिस्त आणि शैक्षणिक प्रगतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
या यशामध्ये शाळेतील शिक्षकांचेही मोलाचे योगदान आहे. ईश्वर गहाणे यांनी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे अनेक उपक्रमांना चालना मिळाली, तर मंगेश तुपट यांनी अथक परिश्रम घेत शाळेच्या विकासकामात महत्त्वाची भूमिका बजावली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तृषाली सुखदेवे व अपर्णा जडे यांनी सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्राची खरकाटे, प्रियंका तलमले आणि विजय मुळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि चांगल्या सवयी रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याशिवाय प्रमिला खरकाटे यांच्या सहकार्यामुळे शाळेतील विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे, उपाध्यक्ष रामेश्वर कांबळे तसेच सर्व समिती सदस्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य शाळेला सतत लाभले.
नगरपरिषद देसाईगंजचे आरोग्य सभापती चैतनदास विधाते तसेच शिक्षण सभापती बंडूभाऊ यांच्या प्रेरणा व प्रोत्साहनामुळे शाळेच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली असून आज देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रातील प्रथम आयएसओ शाळा होण्याचा मान या शाळेला मिळाला आहे.
दरम्यान, सध्या म. गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू असून परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या गुणवत्तापूर्ण आयएसओ मानांकित शाळेत करून घ्यावा, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी त्वरित शाळेशी संपर्क साधावा, असे मुख्याध्यापकांनी कळविले आहे.














