कोरचीमध्ये विजेचा लपंडाव ; नागरिक त्रस्त, उपकरणांचेही मोठे नुकसान
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ११ : तालुक्यातील कोरची येथे मागील काही दिवसांपासून विजेचा सतत लपंडाव सुरू असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभरात वारंवार वीज खंडित होत असल्याने घरगुती कामकाज, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
दिवसभरात अनेक वेळा वीज ये-जा होत असल्यामुळे अनेक नागरिकांच्या इलेक्ट्रिक उपकरणांवर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. टीव्ही, फ्रिज, पंखे तसेच इतर विद्युत उपकरणे बंद पडण्याच्या तक्रारी वाढत असून त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीमध्ये मोटर पंपाच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्यासाठी वीज अत्यावश्यक असते; मात्र वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पिकांना पाणी देणे कठीण होत आहे. परिणामी शेतीच्या कामांवरही त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
रात्रीच्या वेळीही वीज वारंवार खंडित होत असल्याने उकाड्याच्या वातावरणात लहान मुले, वृद्ध व्यक्ती तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ सुरू असल्याने त्यांच्या अभ्यासातही अडथळे निर्माण होत असल्याची पालकांची तक्रार आहे.
याबाबत नागरिकांकडून संबंधित वीज वितरण विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कोरची परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.














