कुरखेडा नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांसाठी TSP निधी मंजूर करा

29

कुरखेडा नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांसाठी TSP निधी मंजूर करा
– भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ११ : कुरखेडा नगरपंचायत हद्दीतील आदिवासी समाजाच्या वस्ती भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी उपयोजना (TSP) अंतर्गत विविध विकासकामांना तात्काळ मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष तथा नगरपंचायत कुरखेडा येथील उपाध्यक्ष मो. कलाम शेख (बबलू हुसैनी) यांनी याबाबत महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना निवेदन सादर केले. हे निवेदन माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती आघाडीचे अध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या मार्फत देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कुरखेडा नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये आदिवासी समाजाची मोठी वस्ती असून त्या भागात अद्यापही अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभागातील आदिवासी स्मशान दहनभूमीची संरक्षण भिंत, गटार बांधकाम, सोलर हायमास्ट लाईट बसविणे तसेच सिमेंट काँक्रीट (सी.सी.) रस्त्यांचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या सर्व कामांसाठी सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी आदिवासी विकास निधी (TSP) योजनेतून मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून या कामांना मंजुरी मिळाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल व मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना आमदार संजय पुराम, माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बरसागडे तसेच भाजप पदाधिकारी सुरेश शाह उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here