रांगी येथे वनवणवा जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

69

रांगी येथे वनवणवा जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न
The गडविश्व,
ता. प्र/धानोरा दि.१९ : वनसंपदा ही मानवाच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची असून तिचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, या संदेशाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी रांगी येथे वनवणवा हंगाम जनजागृती कार्यशाळा उत्साहात पार पडली. पथनाट्याच्या माध्यमातून वनवणवा टाळण्याचे महत्त्व आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत उपस्थितांना प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यशाळा उपवनसंरक्षक आर्या मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागामार्फत रांगी येथील ग्रामपंचायत समाज मंदिरात आयोजित करण्यात आली. मनोरमा बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली यांच्या सहकार्याने चंद्रपूर येथील राकेश निमसरकार व त्यांच्या पथकाने सादर केलेल्या पथनाट्याने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे आयोजन उत्तर धानोरा वनपरिक्षेत्र व रांगी वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी (उत्तर) एस. बी. कायते, वनपाल करमचंद ढवळे, वनसंरक्षक कोहळे, सरपंच फालेश्वरी गेडाम, पोलीस पाटील रामचंद्र कांटेगे, तसेच विविध वनसमिती पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेत वनवणवा टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, वनसंवर्धनाचे महत्त्व आणि नागरिकांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमामुळे परिसरात वनसंरक्षणाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here