चिंगली ग्रा.पं.मध्ये कारवाईचा धडाका : गैरहजर अधिकाऱ्यावर पंचनामा, पदभार काढला
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २० : तालुक्यातील चिंगली ग्रामपंचायतीतील कारभारातील अनियमिततेवर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायत अधिकारी संजय येरमे यांच्या सातत्याने गैरहजेरीमुळे रखडलेल्या विकासकामांबाबत ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी थेट भेट देत कारवाईचा बडगा उगारला.
भुयार यांनी चिंगली ग्रा.पं. कार्यालयात अचानक भेट देताच ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी तत्काळ कार्यालयातील दस्तऐवजांची तपासणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच संजय येरमे यांच्याकडील पदभार काढून तो दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पंचायत समिती धानोरा येथील विस्तार अधिकाऱ्यांनी सरपंच सुंदरशहा तुलावी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयातील कपाटे व आलमारी उघडून सर्व दस्तऐवजांचा पंचनामा केला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चिंगली ग्रा.पं.चा अतिरिक्त पदभार सोडे येथील ग्रामपंचायत अधिकारी जिजा मडावी यांच्याकडे सोपविण्यात आला.
दरम्यान, येरमे यांच्या गैरहजेरीमुळे अनेक शासकीय योजना केवळ कागदोपत्रीच राहिल्याची बाब समोर आली असून, ग्रामविकासावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वीही पंचायत समिती स्तरावर तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
“सदर ग्रामपंचायतीतील दस्तऐवजांचा पंचनामा करून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल,” अशी माहिती विस्तार अधिकारी बबलू आत्राम यांनी दिली.
या कारवाईमुळे चिंगली परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













