कन्यादान योजनेतून मागासवर्गीय नवदांपत्यांना २५ हजारांचे आर्थिक सहाय्य

38

कन्यादान योजनेतून मागासवर्गीय नवदांपत्यांना २५ हजारांचे आर्थिक सहाय्य
– सामूहिक विवाह सोहळ्यांसाठीही शासनाकडून अनुदान; पात्र दांपत्ये व संस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : मागासवर्गीय समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना आर्थिक आधार देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “कन्यादान योजना” प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पात्र मागासवर्गीय दांपत्यांना प्रति जोडपे २५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली डॉ. सचिन मडावी यांनी दिली.
शासनाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती, नवबौद्ध, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातील पात्र दांपत्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच सेवाभावी संस्था, शासकीय प्राधिकरणे किंवा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी प्रति पात्र जोडपे ४ हजार रुपयांचे अनुदानही उपलब्ध करून दिले जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू-वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे. नवदांपत्यातील किमान एक व्यक्ती मागासवर्गीय प्रवर्गातील असावी. तसेच हा दोघांचाही प्रथम विवाह असणे बंधनकारक असून बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कोणतेही उल्लंघन झालेला नसावा. यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम व संबंधित नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असाव्यात. संबंधित संस्था सेवाभावी स्वरूपाच्या असणे आवश्यक असून सामूहिक विवाह सोहळ्यात किमान १० दांपत्यांचा सहभाग असणे अनिवार्य आहे.
अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्था किंवा यंत्रणांनी सहभागी दांपत्यांची माहिती, अर्ज, छायाचित्रे व आवश्यक कागदपत्रे विवाह सोहळा होण्याच्या किमान १५ दिवसांपूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयात सादर करावीत.
या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र दांपत्यांनी घ्यावा तसेच सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या सेवाभावी संस्था, शासकीय व सार्वजनिक प्राधिकरणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here