बोगस बियाणे व जादा दराने खतविक्री करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाचा कडक बडगा
– एमआरपीपेक्षा जास्त दर आकारल्यास गुन्हे दाखल, भरारी पथके अधिक सक्रिय
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके योग्य दरात आणि वेळेवर उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. बोगस बियाण्यांची विक्री, खतांची साठेबाजी तसेच एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित ‘कृषी निविष्ठा उपलब्धता व गुणवत्ता नियंत्रण’ विषयक जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विकास अधिकारी किरण खोमणे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कृषी विभागाचे अधिकारी, खत व बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच डीलर्स व रिटेलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी खरीप हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील भरारी पथके अधिक सक्रिय करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कोणताही विक्रेता छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक दराने विक्री करताना किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करताना आढळल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.
बैठकीत कृषी निविष्ठांच्या विक्रीतील गैरप्रकार रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खत किंवा बियाण्यांसोबत इतर अनावश्यक उत्पादने खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कृषी केंद्रांमधील उपलब्ध साठ्यांची नियमित तपासणी करून बियाणे व खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. बियाणे, खते किंवा कीटकनाशकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी ८२७५६९०१६९ या मोबाईल क्रमांकावर अथवा कृषी विभागाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून सध्या १,४९४ मेट्रिक टन युरिया आणि २०० मेट्रिक टन डीएपी खताचा बफर साठा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पावसाळ्यात दुर्गम भागातील वाहतूक अडचणी लक्षात घेऊन संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त खतसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसारच खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी महसूल, कृषी आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी दिल्या.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews













