‘सुपीक जमीन वाचवा’साठी ४ जूनपासून शेतकऱ्यांचा एल्गार ; जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन
– महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या नावाखाली महायुती-भाजप सरकारकडून सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण करून स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान केले जात असल्याचा गंभीर आरोप करीत, शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ४ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे प्रमुख महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातत्याने विरोध असतानाही एमआयडीसी, विमानतळ तसेच विविध औद्योगिक प्रकल्पांसाठी शासनाकडून कोणताही संवाद न साधता सुपीक शेतजमिनी अधिग्रहित केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेती हिरावून घेणे म्हणजे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी आणि शिरपूरचक परिसरात प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांनी प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याशिवाय जयरामपूर परिसरातील आणखी १३ गावांच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात शासनाने आदेश काढल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या धोरणाच्या निषेधार्थ यापूर्वी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने शासन निर्णयाची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच विविध निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शासन शेतकऱ्यांच्या भावना व मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
दरम्यान, गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतपिकांचे नुकसान, जीविताला धोका आणि गावांमध्ये निर्माण झालेली भीती यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. हत्तींच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण तात्काळ थांबवून पर्यायी जागांचा वापर करावा, तसेच रानटी हत्तींच्या बंदोबस्तासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी ४ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी बांधव, नागरिक, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.
यावेळी पत्रकार परिषदेत दिवाकर निसार, सतीश विधाते, नेताजी गावतुरे, वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, श्रीनिवास ताटपल्लीवार, राजाराम ठाकरे, देवेंद्र ब्राह्मणवाडे, ढीवरु मेश्राम, जीवन निकुरे, अमोल सोरते, प्रमोद भोयर, रेवनाथ बाबनवाडे, वामन निसार, राजू मांदाळे, रुमाजी खेडेकर, परशुराम निकुरे, वासुदेव गेडाम, शांताराम निसार, तरकडू ठाकरे, शोखाजी भोयर, घनश्याम निकुरे, विलास मोहुर्ले, मनोज खेडेकर, श्रावण जेंगठे, भास्कर कांबळे, नदीम नाथानी, प्रतीक बारशिंगे, गणेश मांदाळे, गुरुदास ठाकरे, भारत देशमुख, संतोष निकोडे यांच्यासह प्रस्तावित प्रकल्पग्रस्त गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














