यूआयटी अडपल्लीच्या विद्यार्थ्यांची लॉयड्स मेटल्समध्ये औद्योगिक झेप : उन्हाळी इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षणाला सुरुवात

28

यूआयटी अडपल्लीच्या विद्यार्थ्यांची लॉयड्स मेटल्समध्ये औद्योगिक झेप : उन्हाळी इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षणाला सुरुवात
– सुरजागड मायनिंग प्रकल्पात विद्यार्थ्यांना उद्योगाचा अनुभव
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गोंडवाना विद्यापीठांतर्गत कार्यरत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (यूआयटी), अडपल्ली येथील डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष व द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण होताच लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)च्या विविध प्रकल्पांमध्ये उन्हाळी इंटर्नशिप व औद्योगिक प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
या प्रशिक्षण उपक्रमांतर्गत १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना लॉयड्स अकॅडमिक स्किल सेंटर, बोदली येथे कौशल्य प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे, तर १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना कोन्सारी व सूरजागड येथील औद्योगिक प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी देण्यात आली आहे. विशेषतः मायनिंग इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांना सूरजागड मायनिंग प्रकल्पात नियुक्त करण्यात आले असून, तेथे त्यांना खाण उद्योगाची कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे.
इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना औद्योगिक सुरक्षा, उत्पादन व्यवस्थापन, यंत्रसामग्री हाताळणी आणि कार्यस्थळावरील शिस्त यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे. अनुभवी अभियंते व उद्योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी तांत्रिक कौशल्य विकसित करत असून, त्यांच्या रोजगारक्षमतेतही भर पडत आहे.
विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची योग्य व्यवस्था कंपनीकडून करण्यात आली असून, प्रशिक्षण प्रक्रियेत अधिक सहभाग वाढावा यासाठी स्टायपेंड देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून, त्यांना व्यावसायिक औद्योगिक कार्यसंस्कृतीचा जवळून अनुभव मिळत आहे.
हा उपक्रम लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून साकार झाला आहे. विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक प्राविण्य आणि औद्योगिक अनुभव आत्मसात करावा, यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणासोबत उद्योग क्षेत्राशी जोडण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे बोलले जात आहे.
लॉयड्स मेटल्सकडून यूआयटी अडपल्लीला सातत्याने सहकार्य मिळत असून, भविष्यातही अशा उद्योग-संलग्न प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here