नाल्या कचरा आणि गाळाने तुडुंब : पावसाळापूर्वी धानोरा शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवा

58

नाल्या कचरा आणि गाळाने तुडुंब : पावसाळापूर्वी धानोरा शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवा
– नागरिकांची मागणी, साथीच्या आजारांचा धोका वाढला
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २० : धानोरा शहरातील विविध प्रभागांमध्ये अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली असून, शहरातील नाल्या कचरा आणि गाळाने तुडुंब भरल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून नाल्यांची नियमित साफसफाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू होण्यास कमी कालावधी शिल्लक असतानाही नगरपंचायत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे.
शहरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पावसाचे पाणी रस्त्यांवर तसेच नागरिकांच्या घरांमध्ये घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. तसेच साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरातील ही मूलभूत समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवून सर्व प्रभागांमधील नाल्यांची साफसफाई करावी, अशी जोरदार मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
“पावसाळा तोंडावर आला असताना स्वच्छतेबाबत कोणतीही तयारी दिसत नाही. नागरिकांनी आपल्या आरोग्य आणि सुरक्षिततेविषयी प्रश्न कोणाला विचारायचे?” असा संतप्त सवालही स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर समस्येची नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन धानोरा शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here