दोन्ही पायांनी अपंग, तरीही सेवेत अव्वल : कर्तव्यदक्ष लाईनमनच्या बदलीविरोधात गावकऱ्यांचा एल्गार

76

दोन्ही पायांनी अपंग, तरीही सेवेत अव्वल : कर्तव्यदक्ष लाईनमनच्या बदलीविरोधात गावकऱ्यांचा एल्गार
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २७ : तालुक्यातील गोठणगाव, चांदागड व सालईटोला परिसरात कर्तव्यदक्ष सेवा बजावणारे वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमन) प्रमोद गूडदे यांच्या प्रस्तावित बदलीविरोधात नागरिकांनी तीव्र भूमिका घेतली आहे. “अशा कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याची बदली रद्द करून त्यांना याच ठिकाणी कायम ठेवण्यात यावे,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात २५ मार्च रोजी गोठणगाव परिसरातील नागरिकांनी गडचिरोली येथील विद्युत कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना उपविभागीय अभियंता, कुरखेडा यांच्या मार्फत निवेदन सादर केले.
प्रमोद गूडदे हे दोन्ही पायांनी अपंग असतानाही मागील काही वर्षांपासून अत्यंत जबाबदारीने सेवा बजावत आहेत. कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आड येऊ न देता ते रात्री-अपरात्री विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीची कामे पूर्ण करतात. त्यांच्या तत्परतेमुळे व सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे ते परिसरात विशेष लोकप्रिय झाले आहेत.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, दुर्गम भागात अशा प्रकारे समर्पितपणे सेवा देणारे कर्मचारी क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या बदलीचा निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना सध्याच्याच ठिकाणी कार्यरत ठेवावे.
या निवेदनावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष वामन पाटनकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवेंद्र भोयर, वनहक्क समिती अध्यक्ष राजकुमार दुगा, माजी ग्रामपंचायत सदस्य हिराजी माकडे, मयूर दोनाडकर, अतुल मेश्राम, संदीप कांबळी, विवेक दुगा, भागेश्वर सहारे, दिलेश दोनाडकर, नागेश सिंगाडे, देवदास दुगा यांच्यासह गोठणगाव, चांदागड व सालईटोला येथील अनेक नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याच्या बदलीबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here