धानोरा : अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई,दोन ट्रॅक्टर जप्त

29

धानोरा : अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई,दोन ट्रॅक्टर जप्त
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २६ : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने कडक भूमिका घेत धडक कारवाई सुरू केली आहे. तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या विशेष पथकाने शनिवारी (दि. २५ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास सापळा रचून विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले.
या कारवाईदरम्यान मोहली येथील प्रदीप एकनाथ मेश्राम तसेच तुकुम येथील सुरेंद्र बळीराम मोटघरे यांच्या वाहनांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित दोन्ही ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
या मोहिमेत नायब तहसीलदार देवेंद्र वाळके, अल्पेश बारापात्रे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तालुक्यात महसूल विभागाचा काही प्रमाणात दबदबा निर्माण झाला असला, तरी अवैध रेती तस्करी पूर्णपणे थांबविण्यासाठी सातत्यपूर्ण कारवाईची गरज व्यक्त होत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचे अवैध गौण खनिज उत्खनन अथवा वाहतूक खपवून घेतली जाणार नाही, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.
या धडक मोहिमेमुळे सध्या तरी रेती तस्करांचे धाबे दणाणले असून महसूल विभागाच्या कारवाईची तालुकाभर जोरदार चर्चा सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here