कुरखेडा : ग्रामपंचायत निधीतील लाखोंच्या अपहारप्रकरणी चिखलीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
– मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा धडाका, जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २५ : तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीपैकी तब्बल १२ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी रोशनी सहारे यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर कारवाई करत निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे पंचायत विभागात एकच खळबळ उडाली असून, इतर ग्रामपंचायतींच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली ग्रामपंचायतीला विविध शासकीय योजनांअंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि इतर विकासकामांसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक कामे रखडलेली असताना निधीचा हिशोब स्पष्ट होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संशय निर्माण झाला होता. अखेर याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या.
तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक चौकशी सुरू केली. या चौकशीत ग्रामपंचायतीच्या खात्यातून नियमबाह्य पद्धतीने मोठी रक्कम काढण्यात आल्याचे समोर आले. तब्बल १२ लाख रुपये विनापरवानगी व अनियमित पद्धतीने खर्च किंवा वळते करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला.
चौकशी अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियमांनुसार ग्रामविकास अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
इतक्या मोठ्या निधीच्या गैरव्यवहारात केवळ एक अधिकारी सहभागी होता की इतर कर्मचारी, पदाधिकारी किंवा संबंधित ठेकेदारांचाही सहभाग आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. चौकशीचा विस्तार झाल्यास आणखी काही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी अपहार झालेल्या निधीची तात्काळ वसुली करून रखडलेली विकासकामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे. जनतेच्या विकासासाठी आलेल्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनाही स्पष्ट संदेश गेला असून, शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्यांची आता खैर नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














