अहेरीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान: ३७ बटालियनने आयोजित केली रॅली आणि स्वच्छता मोहीम
The गडविश्व
अहेरी, दि. २५ : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ बटालियनने भारत सरकारच्या ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेच्या अंतर्गत अहेरीमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम आयोजित केली. या मोहिमेअंतर्गत “एक दिवस, एक तास, एक साथ” या संकल्पनेअंतर्गत श्रमदान आणि स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले.
कार्यवाहक कमांडंट सुजीत कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मोहिमेतील पहिला टप्पा अहेरी बस स्थानकापासून भाजी मंडईपर्यंत रॅलीने पार पाडला. यात नगर पंचायत स्वच्छता कर्मचारी, स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले, तसेच भाजी मंडई परिसरात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
नंतर बटालियनने निवडलेल्या CTUs (Cleanliness Target Units) मध्ये शंकरराव बेजलवार कॉलेज समोरील रस्त्याच्या किनाऱ्याची स्वच्छता, तसेच स्वच्छतेशी संबंधित बॅनर आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक रहिवाशांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे आणि स्वच्छतेची संस्कृती रुजवणे होता.
या मोहिमेत ३७ बटालियनचे अधिकारी व जवान, नगर पंचायत अहेरीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, नगर समन्वयक हरिदास पिल्लारे, नगररचना अभियंता जितेंद्र सहारे, शंकरराव बेजलवार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रवींद्र हजारे, हेल्पिंग हँड संस्था, लोकमत सखी मंच, चंद्रभागा मद्दीवार शाळा, आर. डी. कॉलेज, नागेपल्ली तसेच स्थानिक नागरिक व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.
अभियानाच्या यशस्वी आयोजनामुळे अहेरीत स्वच्छतेबाबत जनजागृती वाढली असून, नागरिकांनी स्वच्छतेसाठी सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व जाणवले. मोहिमेच्या माध्यमातून हा संदेश दिला गेला की स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि सामूहिक प्रयत्नांमुळेच आरोग्यदायी व सुंदर पर्यावरण निर्माण होऊ शकते.














