धानोरा मुख्य चौकात रुग्णवाहिकेचा बोरवेल ट्रकला धडक ; गरोदर माता सुखरूप

52

धानोरा मुख्य चौकात रुग्णवाहिकेचा बोरवेल ट्रकला धडक ; गरोदर माता सुखरूप
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २२ : धानोरा येथील मुख्य चौकात स्टेट बँकेसमोर सोमवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास रुग्णवाहिका आणि बोरवेल ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेचे नुकसान झाले असले तरी त्यामधील गरोदर माता सुदैवाने सुखरूप बचावली.
मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका गरोदर महिलेला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी गडचिरोली येथील महिला रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होते. दरम्यान, मुख्य चौकात समोरून जात असलेल्या बोरवेल ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेची ट्रकला जोरदार धडक बसली.
या अपघातात रुग्णवाहिकेच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, रुग्णवाहिकेत असलेल्या गरोदर महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर तातडीने दुसऱ्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करून संबंधित महिलेला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रवाना करण्यात आले.
रुग्णवाहिका चालकाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्यानंतर वाहनाचे ब्रेक लाईट सुरू न झाल्याने अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, अपघाताच्या वेळी मुख्य चौकात वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त असलेले वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे चौकातील वाहतूक व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेची पुढील चौकशी सुरू असून, अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here