आजपासून घुमणार ‘हर हर महादेव’; गडचिरोलीत श्री महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ
– २४ ते २७ जूनदरम्यान विविध धार्मिक विधी, हवन-पूजन, अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : गडचिरोली शहरातील गोकुळनगर बायपास रोड परिसरातील इच्छापूर्ती शिव-साई-नाग मंदिरात आज, २४ जूनपासून श्री महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक महोत्सवात विविध पूजाविधी, हवन, अभिषेक आणि आरतीचे आयोजन करण्यात आले असून परिसर शिवभक्तांच्या उत्साहाने भारावून गेला आहे.
श्री दादाश्री बहुउद्देशीय संस्था, श्री दादाश्री बहुउद्देशीय महिला बचत गट, मानवता पथ भक्ती गुरुमार्ग (महाराष्ट्र) आणि समस्त मानवता पथ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात महादेव मंदिराचे लोकार्पण तसेच शिवलिंग आणि नागदेवता मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
आजच्या पहिल्या दिवशी देवपूजन, जलाधिवास, पुष्पाधिवास, धृताधिवास, हवनपूजन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जून रोजी धान्याधिवास, मिष्ठान्नाधिवास, औषध्याधिवास तसेच हवनपूजन आणि आरती होणार आहे. २६ जून रोजी वस्त्राधिवास, धूपाधिवास, शय्याधिवास यांसह विविध धार्मिक विधी पार पडतील.
सोहळ्याचा मुख्य दिवस असलेल्या २७ जून रोजी सकाळी ९ वाजता मूर्ती स्थापना, अभिषेक, श्रृंगार दर्शन आणि पूर्णाहुती आरतीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर वृद्धाश्रमात भोजनदान तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भक्तिमय सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवान महादेवांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांनी भाविकांना केले आहे.













