गडचिरोलीत मोबाईल शॉप फोडून चोरी करणारे तिघे जेरबंद : १.५० लाखांचे मोबाईल व साहित्य हस्तगत
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : शहरातील रामनगर परिसरातील माऊली मोबाईल शॉपचे शटर तोडून मोबाईल फोन, अॅक्सेसरीज व रोख रक्कम लंपास करणाऱ्या तिघा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
जिल्ह्यात वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी रामनगर येथील मोबाईल दुकान फोडून झालेल्या चोरीचा तपास हाती घेतला होता.
२४ मे २०२६ रोजी रात्री अनिरुद्ध दिकोंडवार यांनी रामनगर येथील आपले ‘माऊली मोबाईल शॉप’ बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप लोखंडी रॉडच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी विविध कंपन्यांचे ९ मोबाईल हँडसेट, मोबाईल अॅक्सेसरीज तसेच रोख रक्कम असा एकूण ९८ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी २६ मे रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. मात्र, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सखोल तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी रोहन व्यंकट दर्रो (वय २२, रा. मुरमाडी, ता. धानोरा) याच्यासह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेले १० मोबाईल फोन, एक आयफोन आणि इतर साहित्य असा सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुख्य आरोपी रोहन दर्रो याला अटक करण्यात आली असून दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज कोळी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धनराज कोळी, शिवाजी देशमुख तसेच पोलीस अंमलदार गोविंद केकाण आणि राजू कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.













