गडचिरोलीत पावसाचा कहर; नदी-नाल्याच्या मधोमध अडकलेल्या तिघांची थरारक सुटका

206

गडचिरोलीत पावसाचा कहर; नदी-नाल्याच्या मधोमध अडकलेल्या तिघांची थरारक सुटका
– भामरागडमध्ये एसडीआरएफची धाडसी बचावमोहीम, एकाच कुटुंबातील तिघांना जीवदान
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भामरागड तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले असून पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आला. लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन जण नदी आणि नाल्याच्या मधोमध अडकून पडल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या तातडीच्या हालचाली आणि एसडीआरएफच्या धाडसी बचाव मोहिमेमुळे तिन्ही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. या थरारक मोहिमेमुळे एकाच कुटुंबातील तिघांना जीवदान मिळाले.
बचाव करण्यात आलेल्यांमध्ये नवी केये कुडयामी (४०), अर्चना केये कुडयामी (१६) आणि अक्षरा केये कुडयामी (३), सर्व रा. लाहेरी, ता. भामरागड यांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघे बुधवारी सकाळी शेतातील कामासाठी गावाबाहेर गेले होते. सकाळपासूनच भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर पामुलगौतम नदी आणि परिसरातील नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास नदीला मोठा पूर आला. त्याचवेळी लाहेरी परिसरातील नालाही दुथडी भरून वाहू लागल्याने तिघे नदी आणि नाल्याच्या मधील भागात अडकून पडले.
सतत कोसळणारा पाऊस, वाढती पाणीपातळी आणि वेगवान प्रवाहामुळे चारही बाजूंनी पुराच्या पाण्याने त्यांना वेढले होते. नदी अथवा नाला पार करणे अशक्य झाले होते. पाण्याचा प्रवाह अधिक वेगवान होत असल्याने तिघेही पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती निर्माण झाली होती.
सायंकाळी सुमारे ६.३० वाजता गावकऱ्यांनी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदतीची मागणी केली. घटनेची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कोणताही विलंब न करता एसडीआरएफ पथकाला बचावकार्यासाठी रवाना करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान मुसळधार पाऊस, अंधार आणि पुराच्या वेगवान प्रवाहाचा सामना करत एसडीआरएफच्या जवानांनी धाडसी बचाव मोहीम राबविली. प्रतिकूल परिस्थितीतही जवानांनी अथक प्रयत्न करत तिघांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
या बचाव मोहिमेत तहसीलदार किशोर बागडे, एसडीआरएफचे पीएसआय मंगलसिंग डाबेराव व त्यांच्या पथकाने, लाहेरी येथील ग्रामस्थांनी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक नागरिकांची तत्परता आणि जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व एसडीआरएफ यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे ही जीव वाचविणारी मोहीम यशस्वी ठरली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Bhamragad #FloodRescue #HeavyRain #SDRF #RescueOperation #EmergencyResponse #RainAlert #FloodSituation #LifeSavingMission #DisasterManagement #GadchiroliNews #MaharashtraNews #BreakingNews #TheGadVishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here