शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी; एफडीएची कडक नियमावली लागू

21

शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी; एफडीएची कडक नियमावली लागू
The गडविश्व
मुंबई, दि. ३० : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, राज्यातील सर्व शाळांच्या ५० मीटर परिसरात उच्च चरबीयुक्त, जंक फूड आणि आरोग्यास अपायकारक खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, शाळा परिसरात कोणत्या पदार्थांच्या विक्रीस मनाई असेल, याची अधिकृत यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नवीन नियमांनुसार शाळांच्या ५० मीटर परिघातील दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि पुरवठादारांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) सर्व निकषांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. हे नियम राज्यातील २२ महिन्यांच्या बालकांपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असून, शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांचाही त्यात समावेश आहे.
एफडीएने जाहीर केलेल्या यादीत समोसे, कचोरी, भजी, फ्रेंच फ्राईज, फ्राईड चिकन यांसारखे तळलेले व फास्ट फूड; केक, पेस्ट्री, कुकीज, बिस्किट्स, डोनट्स यांसारखी बेकरी उत्पादने; मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न, फ्रोजन पिझ्झा यांसारखे पॅकबंद स्नॅक्स; तसेच वनस्पती तूप (डाल्डा), स्टिक मार्जरीन, नॉन-डेअरी कॉफी क्रीमर आणि केकसाठी वापरले जाणारे रेडिमेड फ्रॉस्टिंग/आइसिंग यांच्या विक्री व पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय, शाळांमधील कँटीन, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांसाठी अन्न परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परवान्याशिवाय अन्नपुरवठा करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदार, स्टॉलधारक तसेच शाळा व्यवस्थापनाविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि संतुलित आहार उपलब्ध करून देणे तसेच शाळा परिसरातील अस्वास्थ्यकर खाद्यसंस्कृतीला आळा घालणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here