पावसाचा कहर! गडचिरोलीसह चार तालुक्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, पुरामुळे दहा प्रमुख मार्ग बंद
– अतिमुसळधार पावसाचा इशारा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा खबरदारीचा निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गडचिरोलीसह कुरखेडा, धानोरा आणि अहेरी तालुक्यांतील सर्व शासकीय व खासगी अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना आज, गुरुवार दि. ३० जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित तालुक्यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने तहसीलदार कार्यालयांमार्फत सुट्टीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी रेड आणि येलो अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे नद्या व नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून, काही भागांतील रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.
अचानक पूरस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. सुट्टीचा आदेश संबंधित तालुक्यांतील सर्व शैक्षणिक संस्थांना लागू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्गांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवार, दि. ३० जुलै रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार जिल्ह्यातील दहा प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याची माहिती दिली आहे.
पुराच्या पाण्यामुळे बंद असलेले प्रमुख मार्ग
१) गडचिरोली–धानोरा राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३०वरील रांगी नाला
२) कुरखेडा–वैरागड राज्य मार्ग क्र. ३७७ वरील सती नदी
३) कोरची–बोटेकसा राज्य मार्ग क्र. ३१४ वरील भीमपूर नाला
४) धानोरा–रांगी राज्य मार्ग क्र. ३६८
५) कोरची तालुक्यातील बेतकाठी नाला मार्ग
६) कुरखेडा–तळेगाव–चारभट्टी प्रजिमार्ग क्र. ४६
७) सिरोंचा तालुक्यातील रोमपल्ली–झिंगानूर प्रमुख जिल्हा मार्ग क्र. २६
८) एटापल्ली–गट्टा राज्य मार्ग क्र. ३८१वरील बांडिया नदी पूल
९) आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग ता. भामरागड (पर्लकोटा नदी)
१०) मुलचेरा आलापल्ली ता. मुलचेरा (स्थानिक नाला )
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी नदी-नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे, पुराच्या पाण्यातून वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
##thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Gadchiroli #Bhamragad #FloodRescue #HeavyRain #SDRF #RescueOperation #EmergencyResponse #RainAlert #FloodSituation #LifeSavingMission #DisasterManagement #GadchiroliNews #MaharashtraNews #BreakingNews #TheGadVishva













