‘तो’ शंभर कोटींचा निधी तातडीने संबंधित खात्यात वर्ग करा

162

– जानेवारीपासून सेवानिवृत्ती वेतन २१ हजार देण्याची
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची राज्य सरकारकडे मागणी
The गडविश्व
मुंबई, दि.११ : पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी शंभर कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली होती. घोषणा केलेला ‘तो’ निधी संबंधित खात्यामध्ये तातडीने वर्ग करावा, पत्रकारांचे दरमहा सेवानिवृत्ती वेतन २१ हजार रुपये येत्या जानेवारी पासून सुरू करावे, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सरकारकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये शंभर कोटी रुपयांचा निधी पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी देण्याची घोषणा केली होती. यामध्ये पत्रकारांचे सेवानिवृत्ती वेतन अकरा हजारांवरून एकवीस हजार करण्याची घोषणा केली होती. घोषित केलेला तो निधीही तातडीने देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अद्यापही हा शंभर कोटी रुपयांचा निधी संबंधित पत्रकारांना मदत करण्यात येणाऱ्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. त्याकडे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने सरकारचे लक्ष वेधले.
पत्रकार कल्याण निधी खात्यामध्ये ५० कोटी रुपयांच्या रकमेवर २३ लाख रुपयांचे व्याज मिळते. त्यावर १५४ पत्रकारांना सेवानिवृत्ती प्रति महिना अकरा हजार रुपये प्रमाणे मिळतात. याशिवाय तीन लाखांपेक्षा जास्त निधी पत्रकारांच्या आरोग्य समस्यांवर खर्च होतो. जानेवारीपासून सेवानिवृत्ती लाभधारक पत्रकारांची संख्या दोनशेच्या वर जाईल. आरोग्याचा खर्च दुप्पट होईल अशी स्थिती आहे, त्यामुळे मोठ्या रकमेच्या ठेवीची गरज आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भातील दस्तावेज तयार करून तो वित्त व नियोजन विभागाकडे पाठविला आहे, मात्र त्यावर पुढे अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.
त्यामुळे तातडीने हा निधी संबंधित खात्याकडे वर्ग करावा, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केली आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचीही शिस्तमंडळाने भेट घेतली.

मी शब्द दिला आहे तो पळणारच : मुख्यमंत्री शिंदे

पत्रकारांच्या प्रलंबित विषयांसाठी सरकार काम करीत आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने याबाबत नेहमी माझ्याकडे मागणी लावून धरली होती. ज्या निधीची मी घोषणा केली तो निधी तातडीने देण्याबाबत मी सूचना केल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या शिष्टमंडळाला दिली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ, राजेंद्र थोरात, राज्य कार्यवाहक यास्मिन शेख, मुंबई अध्यक्ष सुरेश टमके यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here