उष्माघाताची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना

120

The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : उन्हाळयामध्ये तापमाणामध्ये सरासरीपेक्षा अधिक वाढ होत असते. त्यामुळे अधिक उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होवु शकतो व वेळीच उपचार न मिळाल्यास उष्माघाताने मृत्युसुध्दा होऊ शकतो. हे टाळण्याकरीता नागरीकांमध्ये उष्माधात संबंधाने माहीती असणे गरजेचे आहे. उष्माघात टाळण्याकरीता करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच उष्माघातावर करावयाची उपाययोजना याबाबतही नागरीकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.

उष्माघात होण्याची कारणे

उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.
कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.
जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. घट्ट कपडयाचा वापर करणे. अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत सबंध येण्याने उष्माघात होतो.

उष्माघाताची लक्षणे

थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे. भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे. रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी.

प्रतिबंधक उपाय

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावी. उष्णता शोषून घेणारे कपडे,(काळया किंवा भडक रंगाचे कपडे) वापरु नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. उन्हामध्ये काम करतांना मधून मधून थेाडीशी विश्रांती घ्यावी. उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे, खाली नमुद केल्याप्रमाणे उपचार घ्यावेत. उन्हात बाहेर जातांना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे याचा वापर करावा. कामांच्या वेळांमध्ये बदल करावा .शक्यतो दुपारी उन्हात काम करणे टाळावे. शाळेच्या वेळांमध्ये बदल करावा.

उपचार

रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावे, वातानुकूलीत खोलीत ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत. आवश्यकतेनुसार शिरेवाटे सलाईन लावावेत. जनतेला उष्माघाताची कारणे, लक्षणे व प्राथमिक उपाययोजना त्याचप्रमाणे उष्माघात होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत आपल्या नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा.

आरोग्य विभागाने उष्माघात संबंधाने केलेली पुर्वतयारी

सर्व प्रा.आ.केंद्र व ग्रा.रुग्णा.,महीला रुग्णा.जि.सा.रुग्णा या ठिकाणी शितकक्ष कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत.शितकक्षा मध्ये कुलर ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच उष्माघात रुग्णाकरीता दोन खाटा आरक्षीत करण्यात आलेल्या आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात रुग्णावर उपचाराकरीता आवश्यक औषधिसाठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. आरोग्य विभागा मार्फतीने उष्माघात प्रतिबंध व उपाययोजना संबंधाने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. उष्माघात दैनंदिन अहवाल सर्व आरोग्य संस्थामार्फत नियमित घेण्यात येत आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath #loksabhaelecation2024)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here