– मजुराने मृत्यूच्या दाढेतून स्वतः ला सुखरूप वाचवले
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १५ : तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर रानटी हत्तीच्या कळपाने हल्ला केला. यावेळी ईश्वर भोयर नामक मजुराचा पाठलाग एक हत्ती करू लागला. मात्र भोयर यांनी हत्त्तीशी नडत त्याच्या तावडीतून आपली कसीबसी सुटका करत स्वतःचा जीव वाचवला. यात ते जखमी झाले. या संपूर्ण घटनेचा थरारक प्रसंग त्यांनी स्वतः सांगितला आहे.
मागील दोन वर्षापासून ओडिशा मधून आलेला रानटी हत्तीचा कळप जिल्ह्यात तळ ठोकून आहे. कधी शेजारील जिल्ह्यात तर कधी राज्यात स्थलांतर करून पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत आहे. अशातच हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे. तर काही जणांचा जीवही गेला आहे. सध्या हत्तीचा कळप कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात आहे. १४ मे रोजी घाटी येथील काही मजूर तेंदुपत्ता तोडण्यासाठी घाटी वन कंपार्टमेंट क्र. २९७ मध्ये सकाळच्या सुमारास गेले. याचवेळी हत्तीचा एका कळप मजुरांच्या दिशेने धावत सुटले. मजुरांनी कोणताही विलंब न करता तेंदुपाने, साहित्य जागेवरच ठेवत पळापळ केली. यावेळी ईश्वर भोयर (वय ५५) रा. घाटी, ता. कुरखेडा यांच्या मागे एक हत्ती धावू लागला. दरम्यान ईश्वर हे आपला जीव वाचविण्यासाठी पळत सुटत झाडावर चढले मात्र हत्तीने ते झाड एका धक्क्यात पाडले. यावेळी ईश्वर हे झाडावरून कोसळले त्यात ते जखमी झाले मात्र तरीही त्यांनी तिथून पळ काढला, तरीसुद्धा हत्तीने पाठलाग सुरूच ठेवला, जखमी अवस्थेत ईश्वर यांनी आपली धावण्याची गती वाढविल्याने अखेर हत्तीने पाठलाग सोडला व कसेबसे ते मुख्य रस्त्यावर पोहचून घरी गेले. दैव बलवत्तर म्हणून ईश्वर हे वाचले. यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली असून या सर्व घटनेचा थरारक प्रसंग त्यांनी स्वतः सांगितला आहे.
सदर जंगल परिसरात हत्तीचा कळप आल्याची माहिती गावकऱ्यांना का देण्यात आली नाही अशी ओरडा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर होत आहे. तसेच त्या हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणीही होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda #wildelephantattack #kurkhedaforest)